होळकर तलाव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव


पाण्याने तुडुंब भरलेला तलाव, मावळतीला निघालेला सूर्य आणि पश्चिमेकडून येणा-या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेला जेजुरगड, पक्षांचा किलबिलाट असे मनाला प्रसन्नता देणारे विहंगम दृश्य मनाचा थकवा नाहीसा करते. भाविक आणि पर्यटकांच्या दृष्टीने जेजुरीतील सायंकाळ निवांत घालविण्यासाठी अतिशय रमणीय ठिकाण म्हणून ज्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलावाचा.
श्रीक्षेत्र जेजुरी नगररचनेचा, जल व्यवस्थापनेतील महत्वाचा दुवा म्हणजे अठरा एकर क्षेत्रावर व्यापलेला होळकर तलाव, हा जलसाठा म्हणजे जेजुरी गावाच्या दृष्टीने अमृतकुंभच आहे. टेकडीच्या सोंडेवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या या तलावावर जेजुरी गावाचा पाणी पुरवठा वर्षानुवर्षे अवलंबून होता, आणि आजही या तलावातून झीरपणा-या पाण्यावर परिसरातील विहिरी व कूपनलिकांना पाण्याची कमतरता कधीच भासत नाही.
जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेकडील डोंगरातून ओढ्याद्वारे वाहत येणा-या पाण्यावर इसवी सन १७७० मध्ये
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी हा तलाव व जननी तीर्थ बांधले, त्या सोबतच तलावाच्या पूर्व-उत्तर बाजूस देवपूजेसाठी फुलबाग निर्माण केली तर दक्षिण बाजूस चिंचेच्या झाडांची बाग तयार केली ज्याचा उपयोग यात्रा काळातील भाविकांच्या निवा-यासाठी होतो. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या तलावाला पाच ठिकाणांवरून खाली उतरण्यासाठी बांधीव पाय-या आहेत तर दोन ठिकाणी मोटेद्वारे पाणी उपसण्याची थारोळी आहेत.तलावाच्या पूर्वेकडील भिंतीमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठ्याचे नियंत्रण करणा-या दटट्याची व्यवस्था आहे, तलावाचे पाणी भूमिगत नळाद्वारे गावातील तीन हौदाना व गायमुखाला पुरविले जात होते.