पेशवे तलाव
पेशवाई मध्ये जेजुरीचा, पुण्याप्रमाणेच कायापालट झाला, होळकरांचे त्यातील योगदान मोठे आहेच, परंतु त्याबरोबरच अनेक सरदार घराण्यांनी सुद्धा याला हातभार लावला. अखेरचे पेशवे बाजीराव रघुनाथ उर्फ दुसरा बाजीराव यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जी काही थोडीफार समाजोपयोगी कार्ये केली त्यापैकीच एक म्हणजे खंडोबा मंदिराच्या अग्नेयेकडील पायथ्याला रमणा परिसरातील ओढ्यावर पाणी साठवण्याचा तलाव बांधला. या तलावाचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापरण्याची व्यवस्था केलेली आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता खूप मोठी आहे परंतु 'पाणी संकलन क्षेत्र' मर्यादित असल्याने तलाव पूर्ण क्षमतेने कधीही भरत नाही. या तलावाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे पूर्वेकडील बांधकामामध्ये पाणी वितरण करण्यासाठी दट्ट्याची व्यवस्था आहे व प्रथम दर्शनी सहज लक्षात न येणारे बल्लाळेश्वर मंदिर या भिंतीच्या पोटात आहे. तलावाच्या मध्यभागी एक गोलाकार विहीर आहे तलाव जरी आटला तरी यामध्ये भरपूर पाणी असते, मध्यंतरी दुष्काळी परिस्तिथी मध्ये जेजुर गडावर येथूनच पाणी पुरविले जात होते.