हुतात्मा स्मारक

हुतात्मा स्मारक

मा.ए.आर.अंतुले, मुख्यमंत्री पदी असताना महाराष्ट्र शासनाने, १९८३ साली एक महत्वपूर्ण निर्णय घेतला, स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा झालेल्या महापुरुषांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या गावी अथवा त्यांना वीरमरण ज्याठिकाणी आले तेथे हुतात्मा स्मारक उभारायचे. महाराष्ट्र शासनाच्या या स्तुत्य उपक्रमांतर्गत श्रीक्षेत्र जेजुरी येथे गावातून जाणा-या आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गालगत क्रांतिवीर हरी मकाजी नाईक यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. रामोशी समाजातील उपेक्षित राहिलेल्या क्रांतीवीराच्या स्मृतींना उजळा मिळण्यास या स्मारकामुळे काही अंशी हातभार लागला. आता पालिकेने याठिकाणी बाग तयार केली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात स्मारकाची रंगरंगोटी झाली, नव्याने काही दिवे लागले. क्रांती ज्योतीचा स्तंभ आणि अष्टकोनी सभागृह असे या वस्तूचे स्वरूप असून सभोवताली हिरवळ आणि झाडे मन प्रसन्न करतात.
येथे हुतात्म्यांच्या स्मृती जागवणारे कोणतेही कार्यक्रम होत नाहीत. वास्तू टिकवून ठेवण्याचा उपचार पाळण्यात आजवर सा-यांनी धन्यता बाळगल्याने या स्मारकांची पडझड अद्याप झालेली नाही. भलेबुरे प्रसंग झेलत रौप्यमहोत्सव पूर्ण करणारे हे स्मारक देशभक्ती व राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवणारे केंद्र बनू शकले नाही. याला केवळ प्रशासनच नाही तर सारेच आपण जबाबदार आहेत.
श्रीखंडेरायाच्या दर्शनासाठी येणा-या भाविक भक्तांनी आणि पर्यटकांनी आवर्जून या हुतात्मा स्मारकास भेट देऊन दोन घटका वेळ घालविण्यास काहीच हरकत नाही.