लवथळेश्वर मंदिर


लवथळेश्वर मंदिर

जेजुरी गावठाणा पासून एक किलोमीटर अंतरावर असलेले लवथळेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचे जागृत स्थान असे मानले जाते. या स्थानाविषयी मार्तंड विजय ग्रंथामध्ये महत्म्य सांगितले आहे, दुर्वास ऋषींचा लवा नामक शिष्य होता त्याला स्वतःला आपल्या तप साधनेमध्ये व्यत्यय येवू नये असे वाटत होते, ही बाब त्यांनी आपल्या गुरूच्या कानी घातल्यानंतर, दुर्वास ऋषींनी शिष्याच्या तपश्चर्येसाठी हा परिसर दानव-शाकिनी-डाकिनी-भूत-पिशाच्च यांच्या संचारापासून अभिमंत्रित करून मुक्त केला, तोच हा लवथळेश्वर परिसर. पुढे कृतयुगामध्ये मणीचूल पर्वतावरील सप्तऋषींना मणीमल्ल दैत्यांपासून आपली कुटुंबे सुरक्षित ठेवण्यासाठी नारद मुनींनी याच परिसरामध्ये धेवण्याचे सुचविले. समर्थ रामदास स्वामींना या मंदिरामध्ये श्रीशंकराची 'लवथवती विक्राळा' ही आरती स्फुरल्याचे सांगितले जाते.
मंदिर जमिनीपासून खाली आतमध्ये असल्याने बाहेरून सहजपणे लक्षात येत नाही.मंदिरामध्ये उतरण्यासाठी पूर्वेकडीलबाजूने पाच सहा पाय-या आहेत त्यांच्या उजव्या अंगावर एक अस्पष्ट सात ओळींचा शिलालेख दिसतो, त्यावर शके १५३० हे साल दिले आहे. मूळ मंदिर उत्तराभिमुख आहे प्रवेश द्वाराबाहेर कोनाड्यांमध्ये देव देवतांच्या मूर्ती आढळतात. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या हातास गणेश मूर्ती व नाग मूर्ती आहे.त्याच्या शेजारीच पश्चिमेकडे एक दरवाजा असून तो 'लवतीर्थ' मध्ये जाण्या चा मार्ग आहे. गणपतीच्या समोरच पाठमोरा मोठा नंदी आहे. नंदी समोर मुख्य गर्भगृहात अडीच फुट उंचीचा जाण्याचा मार्ग आहे. मुख्य गर्भगृह दोन ते तीनच लोक मावू शकतील एवढे अतिशय छोटे असून तेथे लवा ऋषींनी स्थापित केलेले सुंदर शिवलिंग आहे.