छत्री मंदिर

मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर

सुभेदार मल्हारराव होळकर म्हणजे क-हेपठारावर वाढलेले व रेवा तीरावर बहरलेल रांगडे व्यक्तिमत्व.शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार करणा-या मराठे शाहीतील एक प्रमुख सरदार म्हणून मल्हाररावांनी नावलौकिक तर मिळवलाच याउपर उत्तर हिंदुस्थानच्या राजकारणात दरारा निर्माण केला होता. माळव्याची सुभेदारी मिळाल्यानंतर येणा-या उत्पन्नातून जेजुरीच्या कुलस्वामी मल्हारी मार्तंडाच्या मंदिराचे भव्य बांधकाम करण्याचा घाट घातला व हे काम वर्षानुवर्षे चालूच होते अशा लढवय्या वीर मल्हाररावांचा मृत्यू मोहिमेवर असताना आलमपूर येथे २० मे १७६६ रोजी झाला. त्यांच्या पत्नी द्वारकाबाई व बनाबाई सती गेल्या.  
ज्यागावी त्यांचा मृत्यू झाला त्या आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर असे ठेवण्यात आले. तेथे मल्हाररावांची छत्री बांधण्यात आली व समोरच मार्तंडाचे मंदिर बांधण्यात आले. परंतु मल्हारराव होळकरांचे जेजुरीविषयी असलेल्या प्रेमापोटी त्यांच्या गादीचे तिसरे वारस तुकोजी होळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मार्गदर्शना खाली जेजुरी येथे मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर उभे केले.
 पूर्वाभिमुख असलेल्या छत्री मंदिराचे बांधकाम अतिशय प्रमाणबद्ध व रेखीव असून मंदिराचे मंडप व गर्भगृह असे दोन प्राकार आहेत पैकी मंडपाचे छत घुमटाकार आहे व त्यावर आतील बाजूने चित्रे रंगविली आहेत. मंडपामध्ये वातानुविजनासाठी सुरेख कोरीव काम केलेल्या दगडी खिडक्या आहेत. गर्भगृहात लाकडी मेघडंबरीमध्ये खालील बाजूस संगमरवरी शिवलिंग असून मागील कट्ट्यावर मध्यभागी सुभेदार मल्हारराव होळकरांची संगमरवरी बैठी मूर्ती आहे,तर त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांच्या पत्नी गौतमाबाई व बनाबाई यांच्या मूर्ती आहेत.
मंदिरासमोर चौथ-यावर कोरीव नंदीचे भव्य शिल्प आहे, नंदीच्या गळ्यातील घंटा, साखळी व झुलीवरील नक्षी सुबकरित्या कोरलेली आहे.